मकरसंक्रांत हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी संक्रांत साजरी केली जाते. हा सण नवीन ऋतूचे, नवीन आशेचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. भारताच्या विविध भागांमध्ये संक्रांत वेगवेगळ्या पद्धतींनी साजरी केली जाते.
महाराष्ट्रात संक्रांत म्हटले की तीळगूळ, हळदीकुंकू, वाण आणि पारंपरिक पोशाख अशी सुंदर परंपरा डोळ्यांसमोर येते.या सणाशी जोडलेली एक विशेष आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे "काळ्या रंगाची साडी ."
परंपरेनुसार, आपल्या सणांमध्ये काळा रंग शुभ मानला जात नाही. त्यामुळे लग्न, पूजाविधी किंवा धार्मिक सणांमध्ये काळा रंग टाळला जायचा. मात्र मकरसंक्रांत हा सण याला अपवाद ठरला आहे. संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे, विशेषतः काळी साडी नेसण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे.
Shop Online
यामागे एक शास्त्रीय आणि सांस्कृतिक कारण आहे. मकरसंक्रांत हा सण हिवाळ्यात येतो.या थंड वातावरणात ,शरीराला उष्णतेची गरज असते. काळा रंग उष्णता अधिक प्रमाणात शोषून घेतो, त्यामुळे शरीर उबदार राहते.या शास्त्रीय कारणामुळे काळ्या कपड्यांचा वापर संक्रांतीला उपयुक्त मानला गेला. हळूहळू ही गरज परंपरेत रूपांतरित झाली आणि काळी साडी संक्रांतीचा अविभाज्य भाग बनली.
काळी साडी ही केवळ रंगामुळेच खास नाही, तर तिच्या काठावर असलेल्या सुंदर , सोनेरी नक्षीकामामुळे ती अधिक सुंदर दिसते. लाल, हिरवा, सोनेरी किंवा गुलाबी काठ असलेली काळी साडी स्त्रीच्या सौंदर्यात भर घालते. संक्रांतीच्या दिवशी महिला काळी साडी, हिरव्या बांगड्या, गजरा, नथ आणि पारंपरिक दागिने घालतात. अगदी काळ्या रंगाची पैठणी देखील या दिवशी स्त्रिया विशेषतः नववधू नेसतात .
आता आजकाल वेगेवेगळ्या फॅब्रिक मध्ये काळ्या रंगाची साडी मिळते . पण तरीही सिल्क आणि जरीच्या काठाच्या साडयांना प्राधान्य दिले जाते. हि साडी मराठी संस्कृतीचे दर्शन घडवते .
संक्रांतीच्या दिवशी हळदीकुंकू समारंभाला विशेष महत्त्व असते. विवाहित महिलांना बोलावून त्यांना वाण दिले जाते. या वाणामध्ये तिळगूळ, साखर, भांडी, कपडे किंवा उपयुक्त वस्तू दिल्या जातात. काळी साडी नेसून हळदीकुंकू समारंभाला जाणे हे आज एक प्रकारचे सांस्कृतिक सौंदर्य बनले आहे.
आजच्या आधुनिक काळात संक्रांत साजरी करण्याच्या पद्धतीत अनेक बदल होत आहेत. आजकाल तर नवविवाहित जोडपे खास सेम म्हणजेच काळ्या रंगाचे कपडे घालतात. (twinning).यासाठी खास हलव्याच्या दागिन्यांचे असंख्य प्रकार पाहायला मिळतात.
काळी साडी ही केवळ वस्त्र नसून ती स्त्रीशक्तीचे, आत्मविश्वासाचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. ज्या रंगाला कधी अमंगल मानले गेले, तोच रंग संक्रांतीसारख्या शुभ सणावर स्वीकारला गेला, हे आपल्या संस्कृतीचे लवचिक आणि समावेशक स्वरूप दर्शवते. परंपरा अंधश्रद्धेवर नव्हे तर अनुभव, शास्त्र आणि समाजाच्या गरजांवर आधारित असते, हे संक्रांत आणि काळी साडी आपल्याला शिकवतात.
Shop Online
अशा प्रकारे मकरसंक्रांत आणि काळी साडी यांचे नाते केवळ सणापुरते मर्यादित नसून ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे.




Comments
Post a Comment